कुठे गेला तो गाडगेबाबा यांचा संदेश,कुठे पडली निपचित संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता. कुठे अडवला गेला संतांचा वैचारिक वारसा आणि काय सुरु आहे आपल्या गावात एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार, अंधश्रद्धा,अन्याय अत्याचार . कुठून शिरले हे आदम?का ओलांडली त्यांनी गावची शिव ?कारण गावच्या राजकारणात मानवी संस्कृती नाही तर स्वार्थीपणा शिरला याच्याच परिणामाने व्यक्ती व्यक्तीपासून,भाऊ भावापासून ,समाज समाजापासून तुटला नि उभ्या झाल्या आमच्यात पार्टिशनच्या भिंती.तेव्हापासून कोणी कोणाचा सखा नाही,सोबती नाही सारेच जण आपापल्या स्वार्थाने भरडत चालले.माथेभडकू लोकांनी आगीत तेल ओतले नि पेटली गावं नि वस्त्या.निघू लागला संतापचा धूर.जळू लागली अविचारी जळमटे कुणाच्यातरी चुलीतील लाकूड होऊन मग समृद्ध ग्राम,विकासाचं गाव,या सगळ्याबाबी गावाने विसरल्या तसा गावचा विकासही हरवला. आज पुन्हा एकदा तीच गावे तीच राज्यातील माणसं आशेने व्याकुळ झाली यावेळेसतरी कोणी गावच्या नेतृत्वात इमान राखून गावगाडा हकेल जो विकासाचा असेल.अशा गावगाड्यातील निवडणूक म्हणजे तुमची आमची ग्रामपंचायत.
ग्रामपातळीवरील निवडणुकीनंतरचा निकाल आपल्या हाती आला . विजय आणि पराजयाच्या मार्गावरील सर्वच दारे आता खुली झाली.विजयी उमेदवाराचे अभिनंदन. पराभवाच्या सत्याला स्वीकारणाऱ्या त्याही उमेदवारांचे अभिनंदन आपण लोकशाही समृद्धीचा घटक बनून ग्रामीनस्थरावरील आपल्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आपले अभिनंदन व जनतेच्या कौलाच स्वीकार करून ज्या आधारातून जनतेने आपणास कौल दिला त्यास प्रमाणिकपणाचे स्विकारण करून जनतेच्या निर्णयाचा सन्मान करा.मुळातच गाव हा घटक राष्टाचा कणा आहे.तो आपणास प्रबळ करायचा आहे.आजच्या निकालाच्या निमित्ताने आपणास ग्रामस्थरावरील परंपरागत चालणाऱ्या त्याबाबी बाजूला सावरून ग्रामसुधारणा या तत्वांशी एकनिष्ठ रहायचे आहे.ज्या राष्टाचा कणा सुधारलेला असतो त्या राष्टाला प्रगतीच्या शिखरावर जाण्यास मदत होते. आज हाच ग्रामीण भाग तुम्हाला मजबूत करायचा आहे. हे करत असताना राज्यातील आजच्या तमाम ग्रामपंचायतीने एक प्रण करावा जो विकासाशी, ग्रामस्थरीय न्यायाशी सर्वसमावेशक असेल.व गावातील एकनिष्ठतेला जपणारा असेल.अशा प्रकारची तुमची वाटचाल ही आजवरच्या वाद-विवाद,तंटे,गट-तट मोडून एकसंघ ग्रामनिर्मितीची जोपासना करणारी असेल तर ग्रामसुधारणेच उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल.म्हणून आपल्या स्थरातून व्यक्तिभेद न करता सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न करा. ज्याही योजना,उद्दिष्टे तुम्ही सध्या करणार आहात त्यात तुम्हला गरीब,गरजू व्यक्तीला न्याय देता येईल का याला प्राधान्य द्या. गावात संत ,महात्मे, महामानव,विचारवंत यांच्या विचारांची रुजवूनून करण्याचा प्रयत्न करा. कारण राजकारणातील बदलापेक्षा संत,महात्मे,महामानव यांच्या विचारातून होणारा बदल हा व्यक्ती,कुटुंब,समाज,राज्य ,राष्ट्र या सगळ्यांचा उद्धार करण्याची ताकत त्या विचारात आहे.ग्रामपंचायत हा घटक स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात खालचा स्थर असून यास ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम (५)अन्वये ग्रामपंचायतीचा कामकाज चालतो.हे चालवत असताना आपण नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या न्याय,हक्क,अधिकाराची मानहानी होणार नाही.याची दक्षता घ्या.प्रत्येक राष्टातील जनतेला तोच विकास हवा असतो जो त्यांच्या अधिकारात बसतो.म्हणून एक नवी सुरुवात म्हणून आजच्या घडीला आपण जर स्थनिक पातळीवरून विकासाची मुहूर्तमेढ रोवली तर ती तितकीच परिणामकारक ठरेल.म्हणून आजच्या या विजयाच्या प्रबोधिनिलला नवीन ग्रामसंकल्पनेलत बदलवण्याचा निर्धार करा. गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची असून.ती प्रामाणिकपणे पाडा. आजवरच्या राजकीय धोरणांनी राजकारणावरचा विश्वास उडवा अशी प्रतिमा तयार केली आहे.ती तुम्हाला बदलता आली तर उत्तमच म्हणूनच त्या गोष्टींना प्राधान्य द्या जी इथली लोकशाही,शिक्षण,आरोग्य,संस्कृती,कृषी,क्रीडा,सर्वधर्म समभाव,या साऱ्यांना टिकून ठेवेल.मुख्यत्वेकरून आपण जर विकासाच्या संदर्भात भूमिका घेत असाल तर ग्रामपंचायत अंतर्गत विरोधी पक्ष, मित्र पक्ष यांच्या विरोधाला जागा राहणार नाही.काहीतरी नवीन परिवर्तन घडवून आणता येतील का या संदर्भातील आपली कार्यप्रणाली गावाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरेल.आजचा शेतकरी नेहमीच विविध संकटात सापडत आहे.शेतकरी धोरणे,नापिकी,व इतर त्यावरील प्रपंचीक संकटाला तोंड देता देता देता गळ्याला दोर लावून या सगळ्यातून सुटण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आहे. याचा आकडा आपल्या ग्रामपंचायतीतून सोडवता येईल का यावरही लक्ष केंद्रित करून कृषी व कृषिपुरक योजना आपल्या गावपातळीवर राबवून खरच ज्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे अशा व्यक्तींना आधार देण्याचा प्रयत्न नक्की करा.बहुतेक गावात,विधवा,परीतक्त्या,निराधार,अपंग,दृष्टिहीन व विविध समस्येने ग्रासलेल्या स्त्रिया आहेत त्यांना न्याय देता येईल अशी आपली भूमिका नेहमीच ठेवा. गावातील युवकांना काही नवी दिशा देता येईल का हेही पहाच.दलित,आदिवासी,यासह इतरांचा येणारा निधी त्यांच्यासाठीच कसा वापरता येईल यासाठी प्रयत्नशील राहा.गावात आरोग्यविषयक जनजागृती,शिबिरे,घेऊन त्यातूनही आपणास काही सेवा देता येईल का पहा.आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बदलांचे साक्षीदार व्हा,लोक तुम्हाला तुमच्या नेतृत्वाला स्विकारतील. शांतता व सुव्यवस्था हे कोणत्याही परिस्थितीत डागाळू देऊ नका. ग्रामपंचायतीत ग्रामसेवक हा शासनाचा मुख्य दूत असून.तुमच्या ग्रामपंचायतीतील हिशोब,अर्थसंकल्प,नोंदी,विविध प्रमाणपत्रे, दाखले,या सगळ्याबाबतीत ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून भूमिका पाडणाऱ्या ग्रामसेवकाकडेही आपल्या गावातील लोकांना समस्या मांडू द्या.यासंदर्भात लोकप्रतिनिधी व लोकसेवक यांनी एकत्र येऊन लोकांच्या समस्यांचे निराकरण करा. गावपातळीवरील राजकारण हे नेहमीच कलह, वाद तंटे निर्मितीचा प्रत्यय आणणारे असते ती परंपरा आता मोडलीस गेली पाहिजे.आपलं गाव हे आपलं कुटुंब असून त्यातील प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यास मान, सन्मान,सोई सुविधा उपलब्ध करून देऊन गावातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय कसा देता येईल यांवरही थोडं गंभीर व्हाच. अब्रूची धिंडवडे उडवून आजही लुटली जातात वस्त्यान वस्त्यातुन.आजही अन्याय अत्याचाराचे लोन दिवसेंदिवस वाढतच असून स्त्री,दलित,पीडित,शोषित यांच्या सुडावर उठलेली विचारधारा,याचा आपल्या गावपातळीत शिरकाव होऊच देऊ नका.कुजलेली रूढी ,परंपरागत,भेदाभेद पसरवणारी ती संस्कृती नेस्थाभूत करून विवेकाची कास धरणारी,विज्ञान,तंत्रज्ञान,यांचा प्रसार प्रचार करणारी संस्कृती आपल्या गावागावात पसरली गेली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करा. माणसाला माणसाप्रमाणे वागवणारी सर्वाना समान न्याय देणारी व्यवस्था निर्माण करून आपल्या गावात संविधान,विज्ञान,कायदा,तंत्रज्ञान,शिक्षण यावर आपल्या ग्रामपंचायतीची कार्यसूत्रे असायला हवीत.होऊ द्या विवेकाचा जागर तुमच्या गावात.किलबिल किलबिल करून उठू द्या त्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळांच्या भिंती.घुमू द्या असमंतात त्या बालकांची गाणी,खेळू द्या खेळ, घेऊ द्या धडे त्यांना शिक्षणाचे,प्रगतीचे,आदर्श नागरिक बनण्याचे,द्या बळ त्या पंखांना जी तुमच्या ग्रामपंचायतीतील कार्यात मोडतात.होऊन जाऊद्या गावची शाळा समृद्ध ज्ञानदानाचे केंद्र.ठेवा नियंत्रण,द्या निधी त्यांनाही. करा उज्वल ज्ञानाच्या कक्षा.द्या कौतुकाची थाप त्या कोवळ्या मनावर आणि घडवा आपले गाव आणि गावातील बालके.होऊद्या आता समृद्ध गाव,वस्ती,वाडी.चला करा वज्रमुठ एकतेची,न्यायाची, सर्वाना सामावून घेण्याची ,राष्ट्रनिर्मितीची त्यासाठीच्या पुढील कारकीर्दीस राज्यातील सर्व ग्रामपंचायतीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा।
--मनोहर सोनकांबळे
८८०६०२५१५०,८४५९२३३७९१
manoharsonkamble255@gmail.com
( एम. फिल. संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)




1 टिप्पण्या