Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

माध्यमातून पत्रकारिता मूल्य लोप होत आहेत?


माध्यमातून पत्रकारिता मूूल्य लोप होत आहेेेत?








 













 लोकशाहीच्या समृद्धीसाठी माध्यमांनी आपली मूल्य जतन करून जे सत्य आहे त्याचा प्रचार प्रसार करणे गरजेचे असते.प्रत्येक राष्ट्राच्या निर्मितीमध्ये प्रसार माध्यमाची महत्वाची भूमिका असते.कारण माध्यमातून जे दाखवले,सांगितले,प्रकाशित केले जाते त्याचा त्या राष्ट्रातील जनतेवर तसा प्रभाव पडतो. खरे  तर प्रसार माध्यमे शिक्षकांचे काम करतात .समाजाला, शिक्षित करणे,माहिती देणे,मनोरंजन करणे,हे माध्यमाचे काम.एखाद्या शिक्षकाकडून एखादी चुकीची माहिती विद्यार्थ्याला दिली गेली तर ती चुकीची माहित संपूर्ण शाळेत पसरते परिणामी चुकीचे ज्ञान आपल्या पदरी घेऊन समाजात वावरताना अनेक गोष्टीला समोर जावावे लागते.तोच प्रकार भारतीय प्रसार माध्यमातून गेली काही दशकातून चालू आहे. प्रसार माध्यमाचा प्रेक्षकवर्ग,श्रोता, वाचकवर्ग इतका व्यापक आहे की,एका मिनिटात कोट्यवधी लोकांपर्यंत माहिती पोहचते. मग एक नाही दोन नाही तर गेली काही दशके ज्या माध्यमांनी लोकांच्या प्रश्नांविषयी ,सत्याविषयी, निःपक्षपाती,न करता मूळ मुद्याला डावलून धर्म,दंगलीत अडकून विशिष्ट अजेंडा राबविला गेला असेल त्या राष्ट्राच्या लोकांवर कोणता प्रभाव असावा हा संशोधनाचा विषय आहे. चार्ल्स डायना या माध्यम अभ्यासकांच्या मते बातमी म्हणजे काय तर "जेव्हा कुत्रा माणसाला चावतो तेव्हा ती बातमी होत नाही तर माणूस जेव्हा  कुत्र्याला चावतो तेव्हा ती बातमी होते."या बाबतीत नाविन्यता यास चार्ल्स डायना ने अधोरेखित केले.तर भारतीय  माध्यमतज्ञ डॉ.वि. ल.धारुरकर यांच्या मते "बातमी ही संकल्पना मानवी कल्याणाशी निगडित आहे.  अधिकाधिक लोकांचे अधिकतम कल्याण करण्यासाठी बातमीचा वापर करणे गरजेचे आहे बातमी सामाजिक हिताचे, परिवर्तनाचे शस्त्र आहे. अनंत कोळमकर हे म्हणतात की, "वार्ताहर घडलेल्या  घटनेचे वार्तामूल्य जाणून घेऊन बातमी बनवत असतो". या सगळ्या बाबतीत मूल्य महत्वाचे आहे .ते मूल्य जे मानवी जीवनाशी निगडित आहेत.आज भारतीय समाजव्यवस्थेत  चार्ल्स डायना यांच्या बातमी संकल्पनेला अनुसरून माध्यमातून बातमी प्रकाशित केल्या जाऊ लागली पण  बातम्यांना मानवी मूल्याची जोड नाही. चार्ल्स डायना यांच्या बाबतीतील पत्रकारिता भारतात सुरु आहे त्याला मूल्यातत्वांची गरज नाही. त्यातून फक्त टीआरपी वाढीस मदत होते.मुळातच पत्रकारिता उदयास कशी आली तर घटनांना जाणून घेण्याची उत्सुकता आणि घटनेचे विवरण दुसऱ्यापर्यंत पाहोचवण्याच्या इच्छेने पत्रकारितेला जन्म दिला.ही प्रारंभीची संकल्पना असली तरी आज पत्रकारतेचे क्षेत्र व्यापक झाले असून त्याचे स्वरूपही बदलले आहे. आणि आज काळ बदलला स्पर्धा वाढली त्यातून माध्यमात मूल्यांची निश्चितच गरज बनली.तेच मूल्य आज भारतीय माध्यमातून नामशेष होण्याच् या मार्गावर आहेत.भारतीय माध्यमामध्ये एक प्रकार नेहमीच पहावयास मिळतो तो म्हणजे गुलामी पत्कारलेली पत्रकारिता .सत्याचा शोध घ्यायचं नाही.सत्यापर्यंत जायचेच नाही,दाखवायचे नाही अशी पत्रकारिता आजघडीला चालू आहे. आणि जेव्हा गुलामीच्या साखळदंडात स्वतःला बांधून घेतल्यानंतर टीआरपीसाठी असं लाचार व्हावं लागतं. केवळ टीआरपीवर लक्ष केंद्रित करून केलेली पत्रकारिता पत्रकारिता  होय काय? वृत्तवाहिन्यांना टीआरपीसाठी,वृत्तपत्रांना अंकवाढीसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात जाहिरातीसाठीचा खटाटोप मग पत्रकारिता कुठे उरली? या सगळ्या बाबतीत एक महत्वाची बाब स्पष्ट होते की,जी माध्यमे पत्रकारिता मूल्ये सोडून अजेंडा प्रपोगंडा राबविण्याचा चंग बांधतात त्यांनाच असंही टीआरपी, वाचकवर्ग वाढवण्यासाठी अशी लबाडी करावी लागते मुख्यतः जर आज रिपब्लिकन टीव्ही चा विचार केला असता तेथील मुख्य अँकर अर्णव गोस्वामीला एवढं जोरजोरात गळा फाडून ओरडाव लागलं तरीही प्रेक्षक भेटेनात मग त्यांनी ती वेगळीच शक्कल लढवली ती बाब वेगळी .पण प्रामाणिक पत्रकारिता करणारे,मूल्य जपणारे स्वतंत्र व विशेषतः लघु स्वरूप असणाऱ्या प्रसार माध्यमांना ओरडावे लागत नाही तर वाचकवर्ग,प्रेक्षक आपोआप त्यांना फॉलो करू लागली आणि रोज त्यांना वाचू,पाहू लागली हा एक प्रकारे या बदलत्या काळात प्रसार माध्यमातील वेगळाच ट्रेंड म्हणण्यास हरकत नाही.अशा परिस्थितीत आज भारतीय प्रसार माध्यमामध्ये काय काय शिजते हे नव्याने जनतेला माहित होऊ लागले. लोकशाही राष्ट्रात  पत्रकारितेला खूप महत्व असते.पण आज घडीला भारतात लोकशाहीच्या गळ्यावर सूरी असल्याची प्रचिती येते. याबाबतीत माध्यमे जबाबदार असावीत का हा सारा संशोधनाचा विषय होतो. टीआरपीसाठी काहीही करू लागलो तर पत्रकारितेच्या ऐवजी माध्यम संस्थांनी व्यापार,उद्योगधंद्ये उभारणे गरजेचे आहे. आज घडीला भारतीय प्रसार माध्यमातील वस्तुस्थितीचे संशोधन केले असता यातील बरेच कडवे सत्य बाहेर पडेल. भांडवलदारांच्या हातात अस्तित्व टाकलेल्या मीडिया मधून आज सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत माध्यमातून आवाज उठवला जात नाही.खरे तर माध्यमातून विज्ञान,शिक्षण,बेरोजगारी,गरीब ,सामान्य माणसांच्या हक्क अधिकाराविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. टीआरपी वाढवण्याच्या स्पर्ध्येत उत्कृष्ट पत्रकारितेच्या गुणवत्तेवर भर दिला गेला पाहिजे पण पत्रकारितेला बगल देत कुण्यातरी जाहिरातदार,उद्योगधंदे,भांडवलदार,पक्षकीय,समर्थन, राजकीय संबंध,व इतर आपल्या जाहिरातीस अनुकूल संबंध लक्षात घेऊन केली जाणारी पत्रकारिता ही पत्रकारिता मूल्य धुळीस लावणारी आहे.आज बऱ्याच पत्रकारिता प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे बरेच चांगले कौशल्य असूनही त्यांना रोजगार उपलब्ध नाही का तर जाहिराती देणारा,अंकवाढ करणारा, राजकीय हितसंबंध असणारा प्रतिनिधी मीडिया संस्थांना हवा असतो.बातमी महत्वाची नाही तर जाहिरात महत्वाची झाल्याने पत्रकारिता क्षेत्र संशयित होत आहे. ज्या पद्धतीने  माध्यमातून एका ऐका  मुद्याला टार्गेट करून पंधरा पंधरा दिवस वातावरण निर्मिती करून मुख्यमुद्याला बगल दिली जाते अशी माध्यम नीती देशाला घातक ठरू शकतात. कारण शेतकरी आत्महत्या झाल्यावर त्या बातमीला हायलाइट करून प्रकाशित केले जाते तसेच पुन्हा  कुठलाच शेतकरी  आत्महत्या होणारच नाही या मुद्यावर चर्चा  का घडून आणली जात नाही.बेरोजगारी दर कमी करण्यासाठी सरकारला का काही उपयुक्त मुद्दे सुचवले जात नाहीत. समस्येचं मूळ शोधणे तर मीडियाने विसरलेच आहे.कधी काळी काही नामांकित राहिलेल्या की संपूर्ण देशाचे लक्ष त्या त्या वाहिनीकडे असायचे तसा प्रेक्षकवर्गही मोठा असताना आज तो टीआरपी कायम नाही.त्याला कारणेही तशीच आहेत टीआरपी कमी जास्त होतो हे तितकंच सत्य असले तरी दर्शक नाराज होणे यासाठीचे माप कोणतं ?म्हणून आजच्या माध्यम नीतीने गोंधळ घातला आहे.जी बाब माध्यमातून बाहेर पडत नाही त्या बाबी सामाजिक माध्यमातून मोकळ्या होऊ लागल्या आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बऱ्याच बातम्या,प्रसंग,घटना,प्रश्न काही वेळानंतर  मेन स्ट्रीम मीडियातुन आपल्यासमोर येतात.आणि अशा घटनांचा अधिकचा शोध घेण्यासाठी माध्यमे नंतर आटापिटा करतात.ज्या राष्ट्रातील माध्यमेच जर बोडक्या देशभक्तीचा अजेंडा राबवून राष्ट्रातील जनतेला भ्रमित करत असतील तर त्या राष्ट्रातील जनता गुलामीत आहे असे म्हणता येईल कारण गोयबल्स नीती "नुसार खोट्याचा जर पुन्हा पुन्हा प्रचार केला जात असेल तर तेच  असत्य सत्यात रूपांतरित होते" भारतीय समाजव्यवस्तेत ज्या माध्यमांनी आपला प्रपोगंडा राबवला त्याच प्रपोगंड्याच्या आधारावर जनतेला आपलं मत विशिष्ट पक्षाला देण्यासाठी परावृत केलं.खऱ्या पत्रकारितेसाठी लढणाऱ्या पत्रकाराच्या हत्येनंतर, माध्यमांनी किती आवाज उठवला ह्या बाबी अडगळीत आहेत.देशातील कृषिव्यवस्था,अर्थव्यवस्था ही नेहमीच मारकच ठरेल अशा अर्थसंकल्पनेवर किती निपक्ष चर्चा होते व त्याचा विरोध माध्यमे म्हणून काय भूमिका बजावतात?या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरात मीडियाचा दुटप्पीपणा दिसून येतो. सुशांत सिंग,  आणि कंगना राणावत,हे भारतीय कृषिअर्थसंकल्पनेपेक्षा मोठे विषय होऊन बसतात तेंव्हा माध्यमाचा हा टीआरपी फंडा लक्षात येते.आज माध्यमाची भूमिका म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखी  वाटते.राजकारणाचा वचक माध्यमावर की माध्यामाचा वचक राजकारणावर या सगळ्या बाबींचे विश्लेषण केल्यास यातील बरेच काळेबेरे आढळेल. ज्या राष्ट्राचा प्राण संविधान आहे त्या संविधान व त्यातील मूल्यतत्वांची रुजवणूक माध्यमातून न होता तत्त्वांना छेद देण्याचा प्रयत्न माध्यमातून होत असेल तर प्रजासत्ताक भारत  निर्माणात अडथळे कायम राहतील.देशांत पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या विविध प्रकारच्या संस्था,विद्यापीठ,महाविद्यालये आहेत.मीडिया संशोधन केंद्र यांनी आजच्या या पत्रकारितेवर संशोधन करणे गरजेचे आहे. माध्यमे आणि विद्वान पत्रकारांच्या बाबतीत एक बाब लक्षात येते की,जवळपास सत्तेला विरोध करणारे ,या सत्येतील चुकीच्या धोरणांवर आवाज उठवणारे जनतेला जागृत करणारे सर्व पत्रकार,विश्लेषक,हे मुख्य धारेच्या माध्यमात नाहीत आणि ज्यांनी ह्या राजकीय पक्षाची चोचलेगिरी केली ते मेन स्ट्रीम मीडियात खुशाल अजेंडे राबवत आहेत .सत्यवाद्यांना माध्यमात किंमत रहायली नाही.म्हणून आजच्या घडीला एक बाब कायम स्पष्ट करता येऊ शकते ती म्हणजे माध्यमातून पत्रकारिता मूल्यांना छेद देऊन भांडवलदारशाहीला खत पाणी घालण्याचे काम माध्यमातून होत आहे. माणसांच्या न्यायासाठी लढणारी पत्रकारिता आज मुख्य धारेच्या माध्यमातून लुप्त होताना दिसून येऊ लागली. हे मात्र तितकेच खरे...!






                                    -- मनोहर सोनकांबळे
                                           ८८०६०२५१५०
                 manoharsonkamble 255@gmail.com
                                  (एम. फिल. संशोधक विद्यार्थी 
                                 स्कूल ऑफ मीडिया स्टडीज
                   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या