प्रिय ,लोकशाही... इंडियावर प्रेम भारताशी बेवफाई का?
प्रिय,
लोकशाही....
सादर
नमस्कार,
प्रजाहित ,लोकभावना आणि सर्वाना एकसमान सामावून घेणारी न्यायाची तुझी ती संकल्पना आता भारतीय समाजव्यवस्थेत मोडकळीस निघाली. सारे काही उध्वस्त होत असताना लोकशाही म्हणून तुला भुजगावण्याचे रूप दिले जात आहे. म्हणूनच आज मी तुझ्याशी संवाद साधणार आहे.तुझ्या बंद मनातील गाभाऱ्याशी.खरे तर भारतासारख्या विकसनशील देशात आणि संविधानासारख्या जगविख्यात ग्रंथावर आधारित असणाऱ्या देशात लोकशाहीचीस्थिती हिमाल्यासारखी असायला हवी होती.पण याच राष्ट्रात संविधानाचे दहन करणाऱ्या बुद्धिहीनांना तुझ्यातील मर्म काय कळणार. म्हणून तू आमच्या देशात केवळ घोषणा,नारेबाजी,आणि दर्जेदार भाषणातील तोंडी लावण्याचा शब्द झालीस.आमच्या देशातील जनता कुठलीच गोष्ट आपला तर्क जागृत करून तपासत नाहीत.म्हणुनच तर इथं जात,उपजात,धर्म,रंग,भाषा,प्रदेश, संस्कृती यावर राजकारण मोठ्या यशस्वीपणे केले जातात.स्त्रीया, गरीब,पीडित,सर्वसामान्य,जनता, दुर्बल भटके यांच्यावर सतत अन्याय होत राहिला तरच इथे पुढाऱ्यांच्या नाव,प्रसिद्धी,आंदोलने,व कोरडा पुळका दाखवून सहानुभूती मिळवण्यासाठी तू आज खऱ्या रूपाने बहरत आहेस. त्यामुळे मयताच्या टाळूवरची लोणी खाणारी इथली राजकीय व्यवस्था आपल्या प्रसिद्धीची पोळी भाजून घेण्यासाठी कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. म्हणून तुला महत्व उरत नाही.तुझ्या अगाध तत्वज्ञानात असणारी पारदर्शकता आज इथं धुळीस मिळाली.लोकशाहीचा प्राण सामाजिक न्यायात आहे पण इथं सामाजिक अन्याय कसा प्रस्थपित करता येईल यासाठी धोरणे राबवली जातात.समता, स्वातंत्र्य,बंधुता,न्याय, हे सगळी मूल्य आज इथल्या भांडवलदारांच्या घरातील मनोरंजनाचे साधन झाले. भारतीय जनतेला अर्पण केलेले संविधान आणि ती जनता आज आज खऱ्या अर्थाने संविधान समुज शकली नाही.ज्या मार्गाने इथली व्यवस्था गुलामीत्व लादण्याचा प्रयत्न करत आहे ,तो मार्ग आज आपल्या उद्धाराचा मार्ग आहे अशी जनता समजून घेत आहे. खरे सांगू का लोकशाही मला वाटते तू आज भारतीय समाजव्यवस्तेत जणू ऑक्सिजनवरच आहेस.कारण लोकांचे हक्क सुरक्षित नाहीत.लोक सुरक्षित नाहीत.इथली गरीब,दलित,पीडित,मागासवर्गीय मानवी जीवन तर प्रचंड भयावह झाले आहेत. त्यामुळे आत प्रश्न पडू लागले लोकशाही समाजव्यवस्थेत लोकांनी राहायचं की भांडवलदारांनीच. सगळ्या भारतातील व्यवसाय उद्योगधंदे केवळ अंबानी,अदानी यासमान व्यक्तींनीच करायचे तर मग बाकीच्यांनी करायचे काय?म्हणून लोकशाही आज तुला मुद्दाम सांगावंसं वाटते की, जमिनीवर,पाण्यावर,व्यवसाय ,उद्योग,दळणवळण, डिझेल,पेट्रोल,भ्रमणध्वनी,विविध नेटवर्क,मोठमोठी टेंडर,कंपनी ,कारखानदार,ह्या सर्वांवर केवळ विशिष्ट लोकांची मक्तेदारी घट्ट होत जात आहे.आणि यासाठीच जणू लोकशाही मूल्यांची उधळण करून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याऐवजी लोकशाहीच्या उरावर चढ होऊन खाजगीकरणाची सवत आज खुशाल नांदवली जात आहे.म्हणून लोकशाही तू पुन्हा पुन्हा ऐक इथलं टाहो गुदमरलेल्या राष्ट्राचा आणि त्या राष्ट्रातील माणसांचा, शेतकऱ्यांचा,शेतमजूरांचा,विध्यार्थी,स्त्री,दलित पीडित,भटके,मागास,या सर्वांचाच. खरच लोकशाही प्रीत करावी समतेशी,न्याय,स्वातंत्र्य,बंधुत्व न्याय या मूल्याशी पण तू नेमकी याच मूल्याशी तुझी प्रीत आज तोंड लपून बसली.
लोकशाही तुला जगातील विविध
तत्वज्ञांनी ,विचारवंतांनी आपापल्या शब्दात तुझी संकल्पना मांडली त्यापैकी,
लॉर्ड ब्राईस- म्हणतात की, "राज्याची सत्ता सामाजिक सर्व लोकांच्या हाती सामुदायिक स्वरूपात देण्यात आलेला शासन प्रकार म्हणजे लोकशाही होय"
अब्रहम लिंकन- "लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून चालवले गेलेले शासन म्हणजे लोकशाही"
तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर- म्हणतात की," लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारी परिवर्तन रक्तविरहित मार्गानी घडवून आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय" अशाप्रकारे जगाच्या पटलावर तुझे महत्व अनन्य साधारण गणल्या गेले. आणि तुझीच संकल्पना सर्वमान्य होत असताना भारतीय लोकशाही शासनप्रणालीमध्ये मात्र इथल्या भांडवलदारांनी तुझ्या अस्तित्वाला खिंडार पाडले. आणि इथले राजकारण व्यवसाय,उद्योग,भांडवलदारांच्या खिशातून चालते.म्हणूनच तर धोरणेही भांडवलवादी ,हुकमी,शोषणकारीच राबवली जातात. पण आजच्या घडीला जेव्हा तुझे अस्तित्व शून्य असल्याने तूझ्याशी संवाद साधून मन हलकं करण्याशिवाय अन्य काही नाही.ज्या देशातील जनता एखादा कायदा, धोरण,बिल त्यांना अमान्य असतांना कोणत्याही सरकार मात्र कोणत्याही परिस्थितीत तेच बिल ,धोरण लागू करण्यासाठी बळाचा वापर करू लागते.आणि लोकांच्याच हितासाठी तो कायदा आहे असे सांगत सुटते तेव्हा मात्र भीक नको मात्र कुत्रा आवर अशी म्हणायची परिस्थिती आज भारतीयावर आली आहे. तरीही लोकांनी तोच कायदा मान्य करावा याच बाबीला जबरदस्तीने थोपवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या राष्ट्रतील लोकशाही लोकांसाठी,लोकांकडून चालवली जात आहे यात मात्र संशय दरवळतो. जेव्हा लोकशाहीचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे लोकांचा सामाजिक न्याय आणि तो त्यांना मिळाला पाहिजे.तूझ्याशी संवाद साधताना जाणीवपूर्वक सांगावे वाटते की, भारतात आता तुझं नामकरण अंबाणीशाही, अदानीशाही, विषमशाही,अन्यायशाही,विशिष्ट धर्मशाही ,करावेसे वाटते.
तुला पर्याय असणाऱ्या राष्ट्रात, भांडवलशाहीत, हुकूमशाहीत, लोक सुरक्षित असतील पण इथंल तुझं अस्तित्व काय.इथं ज्या विषमसंस्कृतीचा इतिहास या देशातील लोकशाहीला आहे.ती लोकशाही संविधानाच्या कक्षेत आल्यानंतर समृद्ध व्हायला पाहिजे होती.पण ती निष्फळ ठरली. त्यातच आज पुन्हा एकदा त्याच संस्कृतीचे पेव फुटून गुलामित्व लादण्याचा हा अजेंडा इथली शासनव्यवस्था राबवित आहे. परिणामी तुझे आजचे जे रूप आहे ते सार्वभौम नसून व्यक्तिसापेक्ष, धर्मसापेक्ष,संस्कृतीसापेक्ष,झाल्याने आज मूल्यहीन होत आहेस.ज्या राष्ट्राला एकसंघ म्हणून जेव्हा पाहिलं जात तेव्हा अशा राष्ट्राचा महत्वाचा घटक असतो तो म्हणजे तिथला सामाजिक न्याय. पण जर एखाद्या राष्ट्रात सामाजिक न्याय प्रस्थपित करण्याऐवजी लोकांना त्यापासून दुरापस्थच केले जात असेल तर एकसंघ राष्ट्राची निर्मिती शक्य नाही. लोकशाही मला तुझ्यावर दोषरोपन करायचे नाही तर मला आजच्या तुझ्या वास्तवाशी संवाद साधायचा आहे.भारतात सामाजिक विषमता आहे.पण ती निवारण्याची धोरणे आखली जात नाहीत.महत्वाची बाब म्हणजे धोरणे आखली जात नाहीतच आसाही प्रकार नाही.तर प्रत्येक धोरण शेवटी भांडवलशाहीलाच का पोषक ठरते?हा संशोधनाचा भाग आहे.त्यासाठीच आजच ताज उदाहरण म्हणजे दोन-चार भांडवलदार,उद्योगपतीच्या हितासाठी अखंड कृषीक्षेत्र,व कृषक यांना अंबानी ,अदानी,टाटा, बिर्ला यांच्या दावणीला बांधत आहे.आणि त्या कृषिबिलास देशातील सर्वच कृषकापासून ते जवळपास सर्व भारतीयांनी त्या बिलास विरोध केला तरीही सरकारला या गोष्टीचा तसूभरही फरक पडत नसेल तर. आता तूच सांग लोकशाही तू इंडियाची आहेस की भारताचीआहेस? तुझ्या लोकशाही शासन व्यवस्थेत भारत मात्र मला गरीब वाटतो. आणि त्याच भारतातील भांडवलवादी इंडिया गर्भश्रीमंत वाटतो.मेक इन इंडिया,स्मार्ट इंडिया, डिजिटल इंडियाकडून राजरोसपणे भारताचं शोषण चालू आहे.ही भांडवलीव्यवस्था लोकशाहीला छेद देणारी आहे.इंडिया नावाच्या जगतात इथला शेतकरी ,शेतमजूर,सामान्य वर्ग,दलित,पीडित,भटका,आदिवासी,हा घटक येत नाही.ना त्याच्या कुठल्या न्याय, हक्क,अधिकाराच्या कुबड्या तिथे चालत नाही.तू तर लोकशाही आहेस तुझ्या अंगी भेद नसतो. तू दंबलेल्यांचा,पिचलेल्यांचा आवाज आहेस आहेस.तूच फुटपाथवर झोपलेल्या उघड्या नागड्या,बेघराच अस्तीत्व मान्य करणारी ,पण तुलाही आता गरिबांचा, शोषितांचा आवाज होता येणार नाही.तुझ्या चारही स्तंभावर आता भांडवलदारीचे हेर आहेत.त्यामुळे न्यायाची द्वारे बंद झाली. आता पुन्हा असंतोष उसळावा लागेल क्रांतीसाठी काचेत राहणाऱ्या इंडियाला शेतात राबणारा,उपासपोटी झोपणाऱ्या,बेरोजगार,बेघर,अन्यायाचा सतत शिकार होणाऱ्या,न्याय ,हक्क,अधिकारापासून वंचित असलेल्या,नि खऱ्या लोकशाहीला मुकलेल्या अशा या भारताची जाणीव करून देण्यासाठीच. प्रिय लोकशाही तुझे महत्व जाणारा ,तुझ्यावर अवीट प्रेम असूनही भारतासारख्या देशात आज घडीला दिवसें दिवस मात्र पदरी धोकेबाजीच पडावी आणि आज तुझेच अस्तीत्व याच भारतात पूर्णतः धोक्यात असतांना तुझ्या असंख्य हितचिंतकांपैकी निरंतर समृद्धीचा एक पाईक ......!
तुझाच एक
भारतीय ..
--मनोहर सोनकांबळे
(एम. फिल.संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड
८८०६०२५१५०,८४५९२३३७९१
manoharsonkamble255@gmail.com )




7 टिप्पण्या